शिवजयंती उत्सव समिती,ब्रम्हपुरी आयोजित राष्ट्रज्ञान स्पर्धा आयोजनाचे मुख्य हेतू
* घरोघरी शिवचरित्राचा अभ्यास व्हावा.
* सन १६५० ते १८१८ या कालखंडाचा विचार केला तर अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वधर्म आणि स्वसंस्कृतीचे रक्षण करण्याचे उदाहरण अन्य कोणत्याही देशात आढळत नाही.
* परंतु आपल्याच देशात हा इतिहास शिकविला जात नाही. यास्तव मंडळाने आपल्या गौरवशाली इतिहासावर आधारित स्पर्धा सुरु केल्या आहेत.
राष्ट्रज्ञान स्पर्धा माहिती
शिवजयंती उत्सव समिती ब्रम्हपुरी ची स्थापना २०१२ साली ब्रह्मपुरीतील तरुण मित्रांच्या पुढाकाराने झाली. तेव्हापासून मंडळ ब्रह्मपुरीत शिवजन्मोत्सव पालखी सोहळा कार्यक्रम आयोजित करीत आहे. समितीच्या प्रयत्नाने अनेक समाजउपयोगी उपक्रम करण्यात आले. समिती शिवचरित्रचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी अन्यायी, अत्याचारी, धर्मांध सत्तांशी संघर्ष करून एक आदर्श, लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. शेकडो वर्षांच्या सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून समाज आणि राष्ट्राला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. शिवरायांनी स्वतःच्या त्यागमय जीवनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवून समाजाला आदर्शाकडे नेले. शिवरायांनी भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि दहशतमुक्त समाज निर्माण केला. शिवरायांच्या पश्चात दिल्लीपती मुघल बादशहा औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन छोटेसे स्वराज्य जिंकण्यासाठी महाराष्ट्रात आला. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस वर्षे मराठ्यांनी संघर्ष करून हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. हा मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याचा देदीप्यमान इतिहास शिवरायांच्या इतिहासासारखाच आजच्या समाजासाठी प्रेरणादायी आहे.
औरंगजेबाच्या निधनानंतर मराठ्यांनी अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य निर्माण करून शिवरायांचे स्वप्न साकार केले. ह्या प्रेरणादायी इतिहासाचा प्रसार आणि प्रचार करून आम्हांला उद्याचा आदर्श आणि गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करता येईल. याच ध्येयाने शिवजयंती उत्सव समिती ब्रम्हपुरी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रज्ञान स्पर्धा या शिवचरित्र स्पर्धेचे आयोजन करीत आहे.
विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी सर्व शिक्षणसंस्था, शाळा, महाविद्यालये आणि पालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आमच्या या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा ही विनंती.
राष्ट्रज्ञान स्पर्धा माहिती
स्पर्धेकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारीत प्रश्न असतील. विविध पुस्तकांचा आधार घेत सर्व विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा.
स्पर्धेचे स्वरुप
1) स्पर्धेचे शुल्क रु. ५0/- असेल.
2) स्पर्धा ऑनलाईन स्वरुपाची असेल. विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांनी योग्य पर्याय निवडायचा आहे.
3) स्पर्धा केवळ मराठी माध्यमातूनच घेतली जाईल.
4) प्रश्नपत्रिका 100 गुणांची असेल. प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरास 2 गुण दिले जातील. चुकीच्या उत्तरा करिता वजा गुण पद्धती प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी योग्य पर्याय निवडावा.
5) स्पर्धेचा निकाल दिनांक १७ मार्च २०२५ सोमवार रोजी शिवजमनोत्सव सोहळा शेष नगर येथे होईल.
6)गुणवत्ता यादी नुसार निवडक व पात्र विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातील.
पारितोषिक योजना
1) शाळेतून व महाविद्यालयातून प्रथम येणार्याज विद्यार्थ्यास रु. 501 इतके पारितोषिक दिले जाईल.
2) प्रथम पारितोषिक रु. ७००१/-, द्वितीय पारितोषिक रु ५००१/-,तृतीय पारितोषिक रु.३००१/- चतुर्थ पारितोषिक रु.२००१/- पंचम पारितोषिक रु.१००१/-इतक्या रुपयांची पारितोषिके दिल्या जातील .
3) शाळा व महाविद्यालयातील पहिल्या क्रमांकाची निवड करीत असताना एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांस समान गुण मिळाल्यास संगणकीय लकी ड्रॉ पद्धतीने त्यापैकी पहिल्या विद्यार्थ्याची निवड केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय शिवजयंती उत्सव समिती ब्रह्मपुरी चा राहील.
4) स्पर्धेस उपस्थित राहाणार्या सर्व विद्यार्थ्याना सहभाग प्रशस्तिपत्रक देण्यात तसेच भेटवस्तू देण्यात येईल .
5) ज्या शाळा महाविद्यालयातील किमान 40 विद्यार्थी असतील त्या शाळेकरीता प्रोत्साहन पर शाळेतून प्रथम रु ५०१/- पारितोषिक दिले जाईल.
स्पर्धेचे व निकालाचे वेळापत्रक
1) स्पर्धा रविवार दि. ९मार्च २०२५ रोजी होईल.
2) स्पर्धेची वेळ - सकाळी 11.00 ते 12.00 पर्यंत असेल.
3) सकाळी 10.50 वाजता विद्यार्थ्यांनी लॉग इन करावे व सुचनांनुसार परिक्षा द्यावी.
स्पर्धेत कोणाला भाग घेता येईल?
1) सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांना, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेता येईल.
2) प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतंत्र ऑनलाईन फॉर्म व फी विहित मुदतीत समितीचे लिंक वर वर भरणे आवश्यक आहे.
3) ऑनलाईन स्पर्धेसाठी मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणक तसेच इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करण्याची जबाबदारी सर्वस्वी स्पर्धकांवर राहील.
4) ऑनलाईन अर्ज व नियमित शुल्क रु. ५0 स्वीकारण्याची अंतिम मुदत दि.७ मार्च 202५ अशी राहील.
स्पर्धेचे नियम:
1)स्पर्धा हि शिवचरित्राचा अभ्यास व्हावा या उद्धेशाने असल्याने प्रामाणिक पणे द्यावी
2)कोणत्याही प्रकारे कॉपीचा प्रकार आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांना स्पर्धेतून बाहेर केले जाईल.
3) एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत दिले जाणार नाही.
4)एका विद्यार्थ्याऐवजी दुसर्या. विद्यार्थ्याचे नाव घेतले जाणार नाही.
5) विद्यार्थी किंवा पालकांना तक्रार करावयाची असल्यास ती कार्यालय, शिव जयंती उत्सव समिती, ब्रम्हपुरी यांचेकडे लेखी स्वरुपात करावी.
6) प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा सुरु होताना नियोजीत वेळेमध्ये लॉग-इन करणे आवश्यक आहे. रविवार दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी 11.00 वाजता सुरु होणार्या या स्पर्धेसाठी सकाळी 11.15 पर्यंतच लॉग-इन करता येईल.
राष्ट्रज्ञान स्पर्धेचा हेतू स्पर्धा किंवा परीक्षा घेणे हा नसून शिवचरित्र आणि मराठेशाहीच्या इतिहासाचा प्रसार आणि प्रचार करणे हा आहे.